महाराष्ट्र

शहापुरात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न* *शेकडो नागरिकांना घरबसल्या मिळाला शासकीय योजनांचा लाभ*

प्रतिनिधी ठाणे.

*शहापुरात ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ उत्साहात संपन्न*

*शेकडो नागरिकांना घरबसल्या मिळाला शासकीय योजनांचा लाभ*

ठाणे,दि.7 (जिमाका):- राज्य शासनाच्या महसूल व वन विभागाच्या आदेशानुसार, संपूर्ण मार्च ते मे २०२६ या कालावधीत राबविण्यात येत असलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाचा पहिला टप्पा शहापूर तालुक्यात मोठ्या उत्साहात पार पडला. घेरोली येथील शेठ मॅरेज हॉलमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या शिबिरात शेकडो लाभार्थ्यांनी उपस्थित राहून विविध दाखले आणि शासकीय सेवांचा लाभ घेतला.
या विशेष शिबिराचे आयोजन आमदार दौलत दरोडा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, उपजिल्हाधिकारी वरुणकुमार सहारे, उपजिल्हाधिकारी अंजली पवार, माजी आमदार पांडुरंग बरोरा यांच्यासह तालुक्यातील सर्व प्रमुख लोकप्रतिनिधी आणि शासकीय कार्यालयांचे प्रमुख उपस्थित होते.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी नागरिकांना मार्गदर्शन करताना, शासनाच्या योजना तळागाळातील सामान्य माणसापर्यंत पोहोचवणे हाच या अभियानाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगितले.
*वितरित करण्यात आलेल्या सेवांचा तपशील…*
शिबिरादरम्यान प्रशासनाने तत्परता दाखवत विविध १८ प्रकारच्या सेवा नागरिकांना उपलब्ध करून दिल्या. यामध्ये प्रामुख्याने डिजिटल ७/१२, दाखले आणि शेतीविषयक कामांचा समावेश होता.
*वितरीत केलेल्या प्रमुख सेवांची आकडेवारी खालीलप्रमाणे..*
सेवा/दाखल्याचा प्रकार | संख्या |
•डिजिटल ७/१२ वाटप | ८५७ |
•८ अ वाटप | २८५ |
•अकृषिक परवानगी/मोजणीकामी जनजागृती | २७५ |
•तलाठी रहिवासी दाखले | १५५ |
•उत्पन्न प्रमाणपत्र | १०८ |
•सत्यप्रतिज्ञापत्र (Affidavit) | ९० |
•शेती पीक नुकसान ई-केवायसी | ६८ |
•शिधापत्रिका (रेशन कार्ड) संबंधित सेवा | ४७ |
याशिवाय जातीचे दाखले, आधार कार्ड दुरुस्ती, नवीन फेरफार मंजूर करणे आणि संजय गांधी निराधार योजनेच्या प्रकरणांचाही जागेवरच निपटारा करण्यात आला.
*’घाेंगडी बैठकां’चे विशेष कौतुक..*
या अभियानाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी महसूल विभागाने गावोगावी ‘घोंगडी बैठका’ घेतल्या होत्या. या कल्पक माध्यमामुळे ग्रामीण भागातील शेतकरी, महिला आणि विद्यार्थ्यांपर्यंत अभियानाची माहिती पोहोचण्यास मोठी मदत झाली. जिल्हाधिकाऱ्यांसह उपस्थित मान्यवरांनी प्रशासनाच्या या विशेष प्रयत्नांचे भरभरून कौतुक केले.
ग्रामीण भागातील सामान्य जनता, शेतकरी आणि कष्टकऱ्यांची शासकीय कामांसाठी होणारी ओढाताण थांबवणे, हा या अभियानाचा मूळ गाभा आहे. महसूल विभागातील सुधारणांचा लाभ थेट जनतेला देण्यासाठी हे ‘इंटेन्सिव्ह’ (तीव्र) स्वरूपचे अभियान मे महिन्यापर्यंत सुरू राहणार आहे.
शहापूर तालुक्यातील या यशस्वी शिबिरामुळे नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, प्रशासकीय पारदर्शकता आणि वेगवान कामाचा प्रत्यय यानिमित्ताने जनतेला आला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button