विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य : ठाण्यात जिल्हास्तरीय स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक संपन्न* *अपघातमुक्त शालेय प्रवासासाठी दिले महत्त्वाचे निर्देश*

*विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला प्राधान्य : ठाण्यात जिल्हास्तरीय स्कूल बस सुरक्षितता समितीची बैठक संपन्न*
*अपघातमुक्त शालेय प्रवासासाठी दिले महत्त्वाचे निर्देश*
ठाणे,ता.२४ फेब्रु.२०२६
शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित, सुकर आणि धोकामुक्त व्हावा यासाठी शासन व प्रशासनाकडून विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हास्तरीय स्कूल बस सुरक्षितता समितीची त्रैमासिक बैठक मंगळवारी तीनहात नाका येथील ठाणे शहर वाहतूक शाखेच्या उप आयुक्त कार्यालयात पार पडली. यावेळी विद्यार्थ्याच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत अपघातमुक्त प्रवासाचे निर्देश देण्यात आले.
जिल्हास्तरीय स्कूल बस सुरक्षितता समितीचे अध्यक्ष, ठाणे शहर वाहतूक विभागाचे उप आयुक्त पंकज शिरसाट यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. यावेळी पंकज शिरसाट तसेच, समितीचे सदस्य उप प्रादेशिक परिवहन अधिकारी रोहित काटकर आणि कल्याणचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी आशुतोष बारकुल यांनी विविध सुरक्षाविषयक निर्देश दिले.
या बैठकीस जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी, जिल्हा परिषद व ठाणे महापालिका शिक्षणाधिकाऱ्यांचे प्रतिनिधी, टीएमटी व्यवस्थापक भालचंद्र बेहरे, केडीएमटी व्यवस्थापक, स्कूल बस चालक-मालक संघटनेचे पदाधिकारी तसेच महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) चे अधिकारी उपस्थित होते.
वाहतुक उप आयुक्त पंकज शिरसाट यांनी शालेय बस सुरक्षिततेसंदर्भात अनेक उपाययोजना सुचवल्या आहेत. ज्यात प्रत्येक शालेय वाहनांवर डॅशकॅम बसवावेत, जेणेकरून अपघात टाळण्यासह अपघात किंवा नियमभंग झाल्यास नेमकी चूक कोणाची हे स्पष्ट होण्यास मदत होईल. बस मालकांनाही चालकांच्या कामकाजावर देखरेख ठेवणे सुलभ होईल. शाळा भरण्यापूर्वी व सुटण्यापूर्वी अर्धा तास आधीच बसेस शाळेजवळ उभ्या कराव्यात. त्यामुळे वाहतुक कोंडी टाळण्यास मदत होईल. शालेय वाहनांच्या मालकांनी नियमितपणे चालकांशी संवाद साधावा. मार्ग, वाहतूक स्थिती आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसंदर्भातील सूचना याबाबत समन्वय साधण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले. प्रशासनाची अशी सकारात्मक भूमिका पालकांनाही दिलासा देणारी ठरली आहे.
*- रस्ता सुरक्षा प्रशिक्षण बंधनकारक*
सर्व चालक व अटेंडंट यांना रस्ता सुरक्षा प्रशिक्षणासाठी पाठविणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. प्रशिक्षित मनुष्यबळामुळे अपघातांची शक्यता कमी होईल.
ई-चलानबाबत आक्षेप असल्यास संबंधितांनी Mahapolice App मध्ये ‘ग्रिव्हेन्स’ विभागात आपले म्हणणे अपलोड करावे. त्यानंतर पडताळणी करून योग्य तो निर्णय घेतला जाईल. सर्व शालेय बसमध्ये बसविण्यात आलेल्या ब्रेथ एनालायझर मशिनद्वारे दररोज प्रतिबंधात्मक (प्रिव्हेंटिव्ह) तपासणी करण्याचे निर्देश देण्यात आले.
सीएनजीवर चालणाऱ्या शालेय बसच्या टँकची दर तीन वर्षांनी अनिवार्य तपासणी करावी, असेही यावेळी स्पष्ट करण्यात आले.
*- विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सामूहिक प्रयत्नांची शर्थ*
विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड केली जाणार नाही. पोलीस तसेच अन्य प्राधिकरणे व प्रशासन, परिवहन विभाग, शाळा व्यवस्थापन, बस मालक व चालक यांनी समन्वयाने काम केल्यास शालेय विद्यार्थ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित व निर्धास्त होईल. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सामुहिक प्रयत्नांची शर्थ केली जाईल.
– *पंकज शिरसाट, उप आयुक्त, ठाणे शहर वाहतुक शाखा.*




