कायदे विषयक साक्षरते बरोबरच वाहतूक नियमांचा जागर* *जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे आयोजित महाशिबिरात वाहतूक विभागाकडुन जनजागृती*

*कायदे विषयक साक्षरते बरोबरच वाहतूक नियमांचा जागर*
*जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे आयोजित महाशिबिरात वाहतूक विभागाकडुन जनजागृती*
ठाणे,ता.२२ फेब्रुवारी २०२६
महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, ठाणे यांच्या वतीने रविवार, दि. २२ फेब्रुवारी रोजी नागरिकांसाठी व्ही. एन. बेडेकर ठाणे महाविद्यालयाच्या प्रांगणात एकाच छताखाली कायदेविषयक साक्षरता शिबिर व शासनाच्या विविध योजनांची माहिती तसेच प्रत्यक्ष लाभ देण्यासाठी भव्य महाशिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात ठाणे शहर वाहतुक विभागाच्या कक्षात वाहतुक नियमांच्या जाणिव जागृतीला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
ह्या कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीनिवास अग्रवाल, मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती मंजुषा देशपांडे, ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव रविंद्र पाजणकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
महाशिबिरात नागरिकांना मोफत विधी सेवा, कायदेशीर सहाय्य, तक्रार निवारण याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती देत प्रत्यक्ष लाभही देण्यात आला. वाहतुक नियमांचे उल्लंघन केल्यानंतर बजावलेल्या ईं चलान प्रणालीची कार्यपद्धतीचे सादरीकरण आणि राष्ट्रीय लोकअदालतच्या माध्यमातून केलेल्या तब्बल १४ कोटी रुपयांच्या वसुलीची माहिती देत पर्यायी वाद निवारण पद्धतीचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले.
महाशिबिरात ठाणे शहर वाहतूक विभागाने उभारलेला विशेष कक्ष आणि प्रदर्शन मार्गिका विशेष आकर्षण ठरले. पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे, सह पोलीस आयुक्त डॉ. ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या निर्देशानुसार वाहतूक पोलीस उप आयुक्त पंकज शिरसाट यांच्या मार्गदर्शनाखाली ट्राफीक अधिकारी व कर्मचाऱ्यांनी उपस्थितांमध्ये वाहतूक नियमांची जाणीव जागृती केली. काँक्रिट रस्ता सदृश कार्पेट अंथरून त्यावर पादचाऱ्यांना पायी चालता चालता वाहतूक नियमांचे आकलन होईल अशी अभिनव संकल्पना राबविण्यात आली. विविध ट्रॅफिक साईनएजेसचे फलक लावून प्रत्यक्ष उदाहरणांसह नियम समजावून सांगण्यात आले.वाहतूक विभागाच्या कामकाजाची पद्धत, ई-चलन प्रणालीचा डेमो, तसेच आयटीएमएस (Intelligent Traffic Management System) कॅमेऱ्यांची कार्यपद्धती याबाबत माहिती देण्यात आली. ग्रीन कॉरिडॉरच्या माध्यमातून आपत्कालीन परिस्थितीत रुग्णांना तातडीने वैद्यकीय मदत मिळवून देताना बजावलेल्या महत्त्वपूर्ण कामगिरीची माहितीही उपस्थितांना देण्यात आली.
*- ट्रॅफिक सेन्स जागवण्याचा प्रयत्न…*
महाशिबिराच्या या उपक्रमातून नागरिकांमध्ये ट्रॅफिक सेन्स जागवण्याचा आणि नियमांचे पालन करण्याची जाणीव निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आला. कायदेविषयक साक्षरता आणि वाहतूक जनजागृती यांचा संगम घडवून आणणाऱ्या या उपक्रमातुन समाजहिताचा व्यापक संदेश देण्यात आला.




