सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला कळवा पोलिसांचा दणका; ‘ऑपरेशन चैनस्नॅचर’मध्ये आरोपी जेरबंद!”

1
- “सोनसाखळी हिसकावणाऱ्या टोळीला कळवा पोलिसांचा दणका; ‘ऑपरेशन चैनस्नॅचर’मध्ये आरोपी जेरबंद!”
ठाणे प्रतिनिधी
कळवा : कळवा पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी जबरीने हिसकावून मोटारसायकलवरून पसार होणाऱ्या टोळीविरुद्ध कळवा पोलिसांनी ‘ऑपरेशन चैनस्नॅचर’ राबवत धडक कारवाई केली आहे. अवघ्या काही दिवसांत दोन गंभीर गुन्ह्यांचा उलगडा करत आरोपींना जेरबंद करण्यात आले असून लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या कारवाईमुळे परिसरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारांना मोठा धक्का बसला आहे.
दि. ३१ जानेवारी २०२६ रोजी रात्री पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे २ तोळे (अंदाजे २० ग्रॅम) वजनाची सोनसाखळी मोटारसायकलवरून आलेल्या अज्ञात इसमांनी जबरीने हिसकावून नेली होती. या घटनेप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गु. र. नं. १४/२०२६ भा. दं. वि. कलम ३०९(४), ३(५) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला.
त्यानंतर दि. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६.०० वाजता, गणपती पाडा परिसरात अशाच प्रकारे दुसऱ्या महिलेच्या गळ्यातील सुमारे २ तोळे (अंदाजे २० ग्रॅम) वजनाची सोनसाखळी हिसकावण्यात आली. या प्रकरणी गु. र. नं. १६/२०२६ भा. दं. वि. कलम ३०९(४), ३०३(२), ३(५) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.
घटनांचे गांभीर्य लक्षात घेऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथक स्थापन करण्यात आले. घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण तसेच गुप्त माहितीच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्यात आली. पोलिसांनी दि. ९ फेब्रुवारी २०२६ रोजी सापळा रचून संबंधित आरोपींना अटक केली.
अटकेनंतर आरोपींकडून एकूण अंदाजे १,८२,०००/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. त्यामध्ये सुमारे १० ग्रॅम सोन्याचे दागिने (अंदाजे किंमत १,३०,०००/- रुपये), गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल (अंदाजे किंमत ३०,०००/- रुपये) तसेच रोख रक्कम व इतर साहित्य (अंदाजे किंमत २२,०००/- रुपये) यांचा समावेश आहे.
प्राथमिक चौकशीत आरोपींनी इतर ठिकाणीही अशाच प्रकारचे गुन्हे केल्याची कबुली दिल्याची माहिती समोर आली असून पुढील तपास सुरू आहे.
कळवा पोलिसांच्या या वेगवान, नियोजनबद्ध आणि प्रभावी कारवाईमुळे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींमध्ये चांगलीच धास्ती निर्माण झाली आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी पोलीस दल कटिबद्ध असल्याचा ठाम संदेश या कारवाईतून देण्यात आला आहे.
ठाणे पोलिस,,,




