महाराष्ट्र

ठाणे जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला ‘महा निर्यात-इग्नाइट’ मुळे मिळणार नवी गती*

४५० हून अधिक उद्योजकांचा उत्स्फूर्त सहभाग*

 

  1. *ठाणे जिल्ह्याच्या औद्योगिक प्रगतीला ‘महा निर्यात-इग्नाइट’ मुळे मिळणार नवी गती*

*४५० हून अधिक उद्योजकांचा उत्स्फूर्त सहभाग*

ठाणे,दि.13(जिमाका): राज्यातील उद्योजकता आणि निर्यातीला चालना देण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या वतीने आयोजित ‘महा निर्यात-इग्नाइट महाराष्ट्र कन्व्हेन्शन २०२६’ चा ठाणे जिल्हास्तरीय मेळावा गुरुवार, दि.12 फेब्रुवारी रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातील नियोजन भवन येथे संपन्न झालेल्या या परिषदेत अपेक्षेपेक्षा जास्त, म्हणजेच ४५० हून अधिक नवीन उद्योजक आणि निर्यातदारांनी उपस्थिती लावून ठाणे जिल्ह्याच्या औद्योगिक क्षमतेचे दर्शन घडवले.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी याप्रसंगी मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रावर भर देणार असल्याचे प्रतिपादन केले.
कार्यक्रमाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. त्यांनी देशाच्या आर्थिक विकासात आणि रोजगार निर्मितीत उत्पादन (Manufacturing) क्षेत्राचे महत्त्व अधोरेखित केले. “ठाणे जिल्ह्यात मॅन्युफॅक्चरिंग क्षेत्रात वाढ होण्याची मोठी क्षमता आहे, ज्याचा फायदा जिल्ह्याच्या आणि पर्यायाने देशाच्या अर्थव्यवस्थेला होईल,” असे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.
*शासकीय योजना आणि निर्यातीच्या संधी..*
जिल्हा उद्योग केंद्राच्या (DIC) महाव्यवस्थापक श्रीमती सोनाली देवरे यांनी ठाणे जिल्ह्याच्या औद्योगिक प्रोफाईलचे सादरीकरण केले. त्यांनी महाराष्ट्र निर्यात धोरण, निर्यातीसाठी लागणारी प्रक्रिया आणि शासनाकडून मिळणाऱ्या सवलतींची माहिती दिली. विशेषतः भरड धान्य (Millets) आणि कापड (Textiles) उद्योगातील निर्यात संधींवर त्यांनी प्रकाश टाकला. तसेच, ‘एमएसएसआयडीसी’ (MSSIDC) मार्फत राबविल्या जाणाऱ्या ‘फ्लॅटेड गाळा भाडे अनुदान’ योजनेची माहितीही त्यांनी दिली.
कोकण विभागाच्या विभागीय उद्योग सहसंचालक श्रीमती विजू शिरसाट यांनी कोकण विभागात राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या प्रगतीचा आढावा घेतला. तर, फेडरेशन ऑफ इंडस्ट्रीज ऑफ इंडियाचे अध्यक्ष श्री.भालचंद्र रावराणे यांनी उत्पादन क्षेत्रातील वाढीसाठी उद्योजकांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.
या परिषदेत विविध क्षेत्रातील तज्ञांनी उद्योजकांना सविस्तर मार्गदर्शन केले.
* DGFT आणि EXIM बँक: श्री. पी. व्ही. सुरेशकुमार यांनी निर्यात प्रोत्साहन योजनांची माहिती दिली, तर एक्झिम बँकेचे श्री. राहुल नारायण यांनी निर्यात क्षमतेसाठी वित्तपुरवठा आणि ‘उभरते सितारे’ कार्यक्रमावर सादरीकरण केले.
* महिला सक्षमीकरण: ‘फिओ’च्या (FIEO) श्रीमती ॲनी शिखरे यांनी महिला उद्योजकांसाठी असलेल्या ‘शी ट्रेड्स हब’ (She Trades Hub) बद्दल माहिती दिली.
* कृषी आणि सेवा क्षेत्र: ‘अपेडा’चे (APEDA) श्री. पांडुरंग बामणे यांनी कृषी निर्यातीतील संधी सांगितल्या, तर ‘SEPC’ चे श्री. विवेक बक्षी यांनी सेवा क्षेत्रातील निर्यातीचे महत्त्व स्पष्ट केले.
* गुंतवणूक आणि विमा: श्री. मिलिंद काळे यांनी अनुसूचित जाती/जमातीसाठी असलेल्या ‘भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गुंतवणूक निधी’ योजनेची माहिती दिली. श्री. अनिल जाधव यांनी एमएसएमईसाठीच्या ‘विमा साथी’ योजनेबद्दल मार्गदर्शन केले.
* एकल खिडकी योजना: ‘मैत्री’ (MAITRI) च्या नोडल ऑफिसर श्रीमती धनश्री जाधव यांनी ऑनलाइन सत्राद्वारे ‘मैत्री कायदा’ आणि त्यांतर्गत मिळणाऱ्या परवानग्यांची माहिती दिली.
*कौशल्य विकास आणि प्रशिक्षण
अभिनव इन्स्टिट्यूटचे श्री. अफान अंसारी आणि ‘तिसा’चे (TISSA) कार्यकारी सचिव श्री. एकनाथ सोनावणे यांनी प्रशिक्षणार्थी (Apprenticeship) योजना आणि कौशल्य विकासाच्या माध्यमातून उद्योगांना मिळणाऱ्या फायद्यांवर भाष्य केले.
*इनोव्हेटिव्ह उत्पादनांचे प्रदर्शन..*
या कार्यक्रमाचे खास आकर्षण म्हणजे ‘CMEGP’ योजनेच्या लाभार्थ्यांनी लावलेली सहा दालने (Stalls). या ठिकाणी स्थानिक उद्योजकांनी आपल्या नाविन्यपूर्ण उत्पादनांचे प्रदर्शन केले, ज्याचे उपस्थितांकडून भरभरून कौतुक झाले.
या यशस्वी उपक्रमाचे नियोजन जिल्हा उद्योग केंद्र, उद्योग अधिकारी श्रीमती अश्विनी कोकाटे आणि श्री. मारुती दळवी यांच्यासह उद्योग विभागाच्या इतर अधिकारी कर्मचाऱ्यांनी केले. या उपक्रमात ४५० हून अधिक उद्योजकांनी उपस्थिती दर्शवल्याने ठाणे जिल्हा उद्योग केंद्राच्या मेहनतीला मोठे यश मिळाले आहे.
0

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button