ठाण्यात ‘नवतेजस्विनी ग्रामोत्सव २०२६’ चा दिमाखदार सोहळा* *महिला बचत गटांच्या उत्पादनांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

*ठाण्यात ‘नवतेजस्विनी ग्रामोत्सव २०२६’ चा दिमाखदार सोहळा*
*महिला बचत गटांच्या उत्पादनांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*
ठाणे,दि.7(जिमाका):- महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम), ठाणे यांच्या वतीने महिलांच्या कर्तृत्वाला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी ‘नवतेजस्विनी ठाणे ग्रामोत्सव २०२६’ या भव्य प्रदर्शन व विक्री कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाचे दिमाखदार उद्घाटन शनिवार, ६ मार्च रोजी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या महापौर मा. श्रीमती अडव्होकेट हर्षाली चौधरी-थविल आणि नगरसेविका श्रीमती विजयाताई पोटे यांच्या हस्ते संपन्न झाले. ६ ते ९ मार्च २०२६ या कालावधीत चालणाऱ्या या उत्सवातून ग्रामीण महिलांच्या कलागुणांचे आणि उत्पादनांचे दर्शन ठाणेकरांना घडत आहे.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नाबार्डचे डीडीएम श्री. अस्विनीकुमार शुद्धांसू, आरसेटीचे (RSETI) संचालक श्री. आशिष लोहकरे, आक्सेस डेव्हलपमेंटचे श्री. आशिष बोर्डे, माहिती अधिकारी व समाजसेवक श्री. संजय कुऱ्हाडे, कोकण विभागाचे व्यवसाय विकास सल्लागार डॉ. रामेश्वर भोसले आणि श्री. मंगेश शेळके आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला माविम ठाणेचे वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी श्री. संजय गर्जे यांनी प्रास्ताविक करून उपक्रमाचा उद्देश स्पष्ट केला. उद्घाटन सोहळ्यानंतर महापौर ॲड. हर्षाली चौधरी-थविल यांनी प्रदर्शनातील सर्व ७० स्टॉल्सना प्रत्यक्ष भेट देऊन महिलांशी संवाद साधला व त्यांचे कौतुक केले.
यावेळी शिवजयंतीच्या औचित्याने CMRC ग्रुपच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित ओजस्वी पोवाडा सादर करण्यात आला. तसेच नवतेजस्विनी CMRC च्या महिलांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर करून उपस्थितांची मने जिंकली.
या सोहळ्याला माविम ठाणेच्या सहायक जिल्हा समन्वय अधिकारी श्रीमती वर्षा पाटील, जिल्हा प्रकल्प सल्लागार श्री. हेमंत पाटील, जिल्हा कार्यालयीन कर्मचारी, MSRLM चे तालुका कर्मचारी आणि १० CMRC च्या अध्यक्षा, व्यवस्थापक, सहयोगिनी व सीआरपी (CRP) मोठ्या संख्येने उपस्थित होते. ७० स्टॉल्सवरील महिला उद्योजिकांसह एकूण ५०० हून अधिक जणांच्या उपस्थितीने हा परिसर गजबजून गेला होता.
स्थानिक नागरिकांनी या प्रदर्शनाला पहिल्याच दिवशी भेट देऊन महिला बचत गटांनी तयार केलेल्या विविध वस्तू आणि खाद्यपदार्थांची खरेदी करत उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. महिला सक्षमीकरणाच्या दिशेने टाकलेले हे पाऊल ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण अर्थव्यवस्थेला नवी चालना देणारे ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.




