महाराष्ट्र

कोकण विभागातील सर्व जनसंपर्क अधिकाऱ्यांनी “हिंद – दी – चादर” कार्यक्रमाची प्रचार- प्रसिद्धी उत्तमरित्या करावी* *– प्र.उपसंचालक मनोज सानप*

*कोकण विभागातील सर्व जनसंपर्क अधिकाऱ्यांनी “हिंद – दी – चादर” कार्यक्रमाची प्रचार- प्रसिद्धी उत्तमरित्या करावी*
*– प्र.उपसंचालक मनोज सानप*

*नवी मुंबई,दि.17( विमाका):-* “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर यांच्या 350 व्या शहिदी समागम शताब्दी वर्षानिमित्त खारघर, नवी मुंबई येथे 28 फेब्रुवारी व 1 मार्च रोजी कार्यक्रम संपन्न होत आहे. तिसऱ्या टप्प्यात संपन्न होणाऱ्या या कार्यक्रमात नवी मुंबई जिल्ह्याचा समावेश आहे. येथील शीख , सिकलीकर , बंजारा, लबाना , मोहियाल ,सिंधी आणि इतर समाजाचा या कार्यक्रमांमध्ये मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदविला जावा तसेच या कार्यक्रमाच्या यशस्वीततेसाठी कोकण विभागातील सर्व जनसंपर्क अधिकाऱ्यांनी कार्यक्रमाची प्रचार-प्रसिद्धी उत्तमरित्या करावी, असे आवाहन प्र.उपसंचालक मनोज सानप यांनी आज येथे केले.
“हिंद दी चादर” शहिदी समागम कार्यक्रमाच्या अनुषंगाने कोकण विभागातील सर्व जिल्हा माहिती अधिकारी, ठाणे, नवी मुंबईतील सर्व महानगरपालिका-नगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी तसेच सिडको जनसंपर्क अधिकाऱ्यांशी दूरदृष्यप्रणालीद्वारे संवाद साधण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.
प्रारंभी प्र.उपसंचालक श्री.सानप यांनी ही बैठक आयोजित करण्यापाठीमागील भूमिका विशद केली. “हिंद दी चादर” या कार्यक्रमासाठी जिल्ह्यातील अनेक समाज बांधव मोठया प्रमाणावर सामील होणार असल्याचे सांगून श्री.सानप म्हणाले की, विभागातील सर्व जिल्हा माहिती अधिकारी, सिडको, नवी मुंबई महानगरपालिकेच्या सर्व जनसंपर्क अधिकाऱ्यांनी आपापल्या कार्यक्षेत्रात आयोजित केली जाणारी आरोग्य शिबिरे, शाळा-महाविद्यालयातील विविध स्पर्धा, उपक्रम, सामाजिक बैठका, “हिंद दी चादर” श्री गुरु तेग बहादूर यांच्या जीवनावर आधारित सुप्रसिद्ध गायक सतिंदर सरताज यांनी गायलेल्या गाण्याचा प्रसार, इतर नावीन्यपूर्ण उपक्रमांची व्यापक प्रचार-प्रसिद्धी करावी. स्थानिक प्रसारमाध्यम प्रतिनिधींशी संवाद साधून त्यांना या कार्यक्रमाच्या अनुषंगाने प्रशासन करीत असलेल्या तयारीची विस्तृत माहिती द्यावी. वरिष्ठ अधिकाऱ्यांची पत्रकार परिषद आयोजित करावी. प्रत्येक विभागनिहाय जी कामे सुरू आहेत त्या कामांबाबत संबंधित अधिकाऱ्यांचे बाईट्स प्रसारित करावेत. शीख, सिकलीकर , बंजारा, लबाना, मोहियाल,सिंधी आणि इतर समाजाविषयी स्वतः माहितीपर लेख लिहून त्यास प्रसिद्धी द्यावी. विविध समाजातील लेखकांकडून सामाजिक माहितीपर लेख लिहून घ्यावेत आणि ते प्रसारित करावेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रशासनाने निर्माण केलेल्या सोयीसुविधांबाबतची इत्यंभूत माहिती प्रत्येक भाविकापर्यंत पोहोचेल, यासाठी शक्य ते सर्व जोरदार प्रयत्न करावेत. सोशल मीडियाचा प्रभावी वापर करावा. आपल्या भारत देशाच्या संस्कृती संवर्धनासाठी, एकोप्यासाठी, विकसित भारत 2047 चे स्वप्न पूर्ण होण्याच्या दृष्टीने असे कार्यक्रम यशस्वी करण्याची, त्यासाठी आपले योगदान देण्याची आपली नैतिक जबाबदारी असल्याचेही त्यांनी सांगितले.
याप्रसंगी रत्नागिरी जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते, पालघर जिल्हा माहिती अधिकारी राहुल भालेराव, विभागीय माहिती कार्यालयातील सहायक संचालक तथा रायगड प्र.माहिती अधिकारी संजीवनी जाधव, मुंबई महानगरपालिका जनसंपर्क अधिकारी तानाजी कांबळे, नवी मुंबई महानगरपालिका जनसंपर्क अधिकारी महेंद्र कोंडे, सिडकोच्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे, ठाणे महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारी माधवी पोफळे, भिवंडी महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी श्रीकांत परदेशी, मीरा-भाईंदर महानगरपालिका जनसंपर्क अधिकारी राज घरत, पनवेल महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी श्री.नितीन साके व वर्षा कुलकर्णी, अंबरनाथ नगरपालिकेच्या जनसंपर्क अधिकारी किमया पवार, विभागीय माहिती कार्यालयाचे माहिती सहाय्यक तथा ठाणे प्र.माहिती अधिकारी प्रवीण डोंगरदिवे, सर्व जिल्हा माहिती कार्यालयातील कर्मचारी हे या बैठकीस उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button