आगामी जनगणनेसाठी ठाणे प्रशासन सज्ज; तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ*
*आगामी जनगणनेसाठी ठाणे प्रशासन सज्ज; तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ*
ठाणे,दि.26 (जिमाका):ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय येथील नियोजन समिती सभागृहात दि.26 फेब्रुवारी ते 28 फेब्रुवारी 2026 या कालावधीत प्रधान जनगणना अधिकारी तथा जिल्हाधिकारी ठाणे व आयुक्त, ठाणे महानगरपालिका यांच्या कार्यक्षेत्रातील जनगणना कार्यासाठी नियुक्त चार्ज अधिकारी, जनगणना लिपिक व तांत्रिक सहाय्यक यांचे तीन दिवसीय प्रशिक्षण शिबिराचा शुभारंभ संपन्न झाला.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचा उद्देश आगामी जनगणना 2027 च्या पहिल्या टप्प्यातील (घरयादी व घरगणना) प्रक्रियेची अचूक, पारदर्शक व वेळेत अंमलबजावणी सुनिश्चित करणे हा आहे.
प्रशिक्षणामध्ये जनगणना संदर्भातील नियमावली, माहिती संकलन पद्धती, CMMS Portal, डिजिटल अँप्लिकेशनचा वापर, डेटा पडताळणी प्रक्रिया तसेच क्षेत्रीय पातळीवरील समन्वय याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
प्रशिक्षण सत्रांमध्ये तज्ज्ञ मार्गदर्शकांकडून प्रात्यक्षिके व शंका समाधान सत्रांचे आयोजन करण्यात आले असून, सहभागी अधिकाऱ्यांना प्रत्यक्ष कामकाजासाठी आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय बाबींवर मार्गदर्शन करण्यात येत आहे.
या प्रशिक्षणासाठी सर्व तहसिलदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचारी, तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांमधील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.




