महाराष्ट्र

“ते पन्नास दिवस” ही कादंबरी अभ्यास कारणातून हटवल्यास खबरदार!

"राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ" महाराष्ट्रभर जनआंदोलन उभे करेल असे आवाहन करण्यात आले आहे.

सप्रेम नमस्कार!

ते पन्नास दिवस’ ही कादंबरी अभ्यासक्रमातून हटविल्यास खबरदार..!

चंद्रपूर (प्रतिनिधी):
पवन भगत लिखित ‘ते पन्नास दिवस’ ही कादंबरी मराठी अभ्यासक्रमातून वगळावी, अशी मागणी ९ डिसेंबर रोजी संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या कथित विद्वत परिषदेत सदस्य डॉ. संगीता जगताप व डॉ. हेमंत देशमुख यांनी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. सदर मागणी ही जातीय द्वेषभावनेतून प्रेरित असल्याचा आरोप राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाने केला आहे.

या कादंबरीत हिंदू–मुस्लिम, दलित–ब्राह्मण यांच्यातील सामाजिक एकोपा, देशाप्रती समर्पण, मानवतेचा संदेश तसेच कोरोना काळात श्रमिक, कष्टकरी वर्गाने भोगलेली वास्तविक दुःख, वेदना व उपेक्षा यांचे प्रभावी चित्रण करण्यात आले आहे. मात्र हे वास्तव कथित विद्वानांना दिसले नाही का? असा सवाल उपस्थित करण्यात आला आहे.

जर या कादंबरीतील सामाजिक वास्तव, मानवी वेदना आणि समरसतेचा आशय जाणवू शकत नसेल, तर अशा कथित विद्वानांना त्यांची जागा दाखवून द्यावी लागेल, असा इशारा राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राज्य संघटक व पुरोगामी साहित्य संसदेचे माजी राज्य अध्यक्ष नरेंद्र सोनारकर, तसेच पुरोगामी पत्रकार संघाचे विदर्भ अध्यक्ष मनोज मोडक यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

मराठी अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. काशीनाथ बहाटे यांनी ही कादंबरी अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यामागील भूमिका स्पष्ट करताना दलित साहित्याचे महत्त्वही अधोरेखित केले होते. असे असतानाही जातीय मानसिकतेतून ही कादंबरी हटविण्याची मागणी होणे, हे पुरोगामी महाराष्ट्रासाठी दुर्दैवी असल्याचे मत सोनारकर यांनी व्यक्त केले.

“कथित विद्वानांनी लेखकाची जात वाचली, कादंबरी वाचली नाही” – ॲड. योगिता रायपुरे

‘ते पन्नास दिवस’ या कादंबरीचे लेखक आंबेडकरवादी विचारांनी प्रेरित असल्याने, कोरोना काळातील भीषण वास्तव प्रामाणिकपणे मांडण्याचा प्रयत्न या कादंबरीत करण्यात आला आहे. मात्र जातीच्या मानसिक आजाराने ग्रस्त असलेल्या कथित विद्वानांनी कादंबरी न वाचता केवळ लेखकाची जात पाहून विरोध सुरू केल्याची संतप्त प्रतिक्रिया पुरोगामी साहित्य संसदेच्या राज्य अध्यक्षा ॲड. योगिता रायपुरे यांनी दिली.

दरम्यान, ही कादंबरी अभ्यासक्रमातून हटविण्यात आल्यास राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ, संलग्न अन्याय अत्याचार निवारण समिती व पुरोगामी साहित्य संसद यांच्या वतीने, संघाचे संस्थापक अध्यक्ष विजय सूर्यवंशी तसेच केंद्रीय उपाध्यक्ष बाळासाहेब आढांगळे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नरेंद्र सोनारकर यांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button