सी, पी, राधाकृष्णन देशाचे १५ वे उपराष्ट्रपती.
देशाचे १५ वे उपराष्ट्रपती यांना ४५२ मते मिळुन विजयी.

शिवधर्म वृत्तांत
सी. पी. राधाकृष्णन देशाचे १५वे उपराष्ट्रपती
नवी दिल्ली – देशातील संसदीय लोकशाहीच्या इतिहासात आणखी एक महत्वाचा टप्पा पार पडला असून भारतीय जनता पक्ष (भाजपा) समर्थित राष्ट्रीय जनतांत्रिक आघाडीचे (एनडीए) उमेदवार व महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांची देशाच्या १५व्या उपराष्ट्रपतीपदी निवड झाली आहे.
९ सप्टेंबर रोजी संसद भवनात पार पडलेल्या उपराष्ट्रपती निवडणुकीत राधाकृष्णन यांना ४५२ मते मिळाली, तर विरोधकांच्या INDIA आघाडीचे उमेदवार न्यायमूर्ती (सेवानिवृत्त) बी. सुदर्शन रेड्डी यांना ३०० मते मिळाली. या विजयाने एनडीएला मोठा राजकीय दिलासा मिळाला असून संसदेत सत्ताधारी पक्षाची ताकद आणखी दृढ झाली आहे.
एकूण ७८१ मतदारांपैकी ७५२ मते वैध ठरली. त्यामध्ये राधाकृष्णन यांना बहुमत मिळाले. काही पक्षांनी मतदान न करण्याचा निर्णय घेतल्याने निवडणुकीत वेगळा राजकीय संदेशही गेला.
तामिळनाडूतील प्रगल्भ संघ परिवार कार्यकर्ता म्हणून ओळखले जाणारे राधाकृष्णन हे दोन वेळा खासदार राहिले आहेत. त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल म्हणून अल्पावधीत प्रभावी कामगिरी केली. ओबीसी समाजघटकातून आलेले असल्याने त्यांच्या निवडीला विशेष राजकीय महत्व प्राप्त झाले आहे.
राधाकृष्णन यांचा शपथविधी १२ सप्टेंबर २०२५ रोजी पार पडणार असून त्यानंतर ते राज्यसभेचे सभापती पदही सांभाळतील.
या निकालानंतर देशभरातून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत असून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी “राधाकृष्णन यांची निवड ही देशाच्या प्रगतीसाठी नवा टप्पा आहे” असे ट्विटद्वारे म्हटले आहे.




