राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे राष्ट्रीय संघटक मा. निलेशजी ठाकरे..
कला समाज कार्य आणि पत्रकारितेचा बहुमूल्य संगम...

कला, समाजकार्य, राजकारण आणि पत्रकारितेचा बहुमूल्य संगम – निलेश भाऊ ठाकरे
काही व्यक्तिमत्त्वं असतात, जी एका नव्हे तर अनेक क्षेत्रांत आपली ओळख निर्माण करतात. अशी माणसं केवळ एकाच वाटेवरून चालत नाहीत तर अनेक मार्गांवरून समाजाशी, लोकांशी, व्यवस्थेशी आणि स्वतःशी संवाद साधत आपली स्वतंत्र छाप सोडतात. असेच एक बहुआयामी, प्रेरणादायी व्यक्तीमत्व म्हणजे निलेश भाऊ ठाकरे.
कला, समाजकार्य, राजकारण आणि पत्रकारिता ही चारही क्षेत्रं एकत्र सांभाळणं आणि प्रत्येकात ठसा उमटवणं हे सोपं नाही. परंतु हे कठीण कार्य निलेश भाऊंनी आपल्या तल्लख बुद्धी, कठोर परिश्रम आणि सतत जिद्दीच्या बळावर शक्य करून दाखवलं आहे. त्यांचा जन्म चंद्रपूर शहरातील चोरखिडकी परिसरातील पंचशील वॉर्डमध्ये झाला. एका अत्यंत सामान्य, गरीब घरात जन्म घेऊन, कोणतीही विशिष्ट पार्श्वभूमी नसताना केवळ स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी एक यशस्वी आयुष्य घडवलं.
ही गोष्ट केवळ एखाद्या यशस्वी माणसाच्या कारकिर्दीची नाही तर हा प्रवास आहे एका खडतर जीवनातून साकार झालेल्या स्वप्नांचा, हा प्रवास आहे एका सामान्य माणसाचा जो असामान्य झेप घेण्यास तयार होता. चंद्रपूर शहराच्या त्या कडक उन्हात, धुळीच्या वावटळीत आणि गरिबीच्या वास्तवात घडलेल्या या व्यक्तिमत्त्वाचा प्रवास आज हजारो तरुणांसाठी प्रेरणेचा स्रोत ठरतो आहे.
निलेश भाऊ ठाकरे यांचा जन्म अत्यंत साध्या आणि कष्टकरी कुटुंबात झाला. वडील प्रभाकर शंकरराव ठाकरे मजुरी करून घर चालवत होते तर आई सुमन ठाकरे या एका खाजगी प्राथमिक शाळेत लहान मुलांना शिकवून कुटुंबाच्या उदरनिर्वाहात हातभार लावत होत्या. हे दाम्पत्य चार मुलांचे आई-वडील होते. शिक्षण, अन्न, वस्त्र अशा मूलभूत गरजांसाठीही झगडावं लागणारं हे कुटुंब होते, पण या घरात संस्कारांची शिदोरी मात्र भरभरून होती.
निलेश हा त्यांचा दुसऱ्या क्रमांकाचा मुलगा. बालपणापासूनच त्याच्या स्वभावात एक खोडकरपणा, चंचलपणा होता. तो खूप मस्तमौला, हसतमुख आणि घरातला ‘मनोरंजन करणारा’ मुलगा म्हणून ओळखला जायचा. जिथे गेला तिथं हसू पेरणारा आणि घरात सतत वातावरण हलकंफुलकं ठेवणारा निलेश लहानपणीपासूनच आजूबाजूच्या लोकांचा लाडका होता.
त्याचं प्राथमिक शिक्षण चंद्रपूर शहराच्या मध्यभागी असलेल्या अबुल कलाम आझाद गार्डनशेजारील ‘राणी राजकुंवर प्राथमिक शाळा’ येथे झालं. या शाळेची निवड विशेष कारणास्तव झाली कारण त्याच्या शाळेसमोरच असलेल्या ‘राणी राजकुंवर बेकरी’त त्यांचे वडील मजुरीचं काम करत होते. त्यामुळे वडिलांसोबत बरोबरच त्याची शाळेत ये-जा होत असे. सकाळी वडील बेकरीत आणि मुलगा शाळेत. हा जीवनाचा सुरुवातीचा टप्पा एका साध्या परंतु स्पर्शून जाणाऱ्या अनुशासनाने सुरू झाला.
शाळेत तो हुशार नव्हता, असं कुणी म्हणणार नाही पण त्याचं लक्ष मात्र नेहमी नवीन काहीतरी करण्यात, सर्जनशील गोष्टींचा शोध घेण्यात असायचं. शालेय वयातसुद्धा निलेशला गाण्याची, अभिनयाची आवड होती. अभ्यासासोबतच तो छोट्याछोट्या कार्यक्रमांमध्ये भाग घ्यायचा आणि शिक्षकांचे मन जिंकून घ्यायचा.
प्राथमिक शिक्षणानंतर निलेशने माध्यमिक शिक्षणासाठी चंद्रपूर शहरातील घुटकाळा वॉर्डमध्ये असलेल्या ‘नेहरू विद्यालय’ या शाळेत प्रवेश घेतला. घरची परिस्थिती बिकट असली, तरी शिकायचं आणि मोठं व्हायचं हे त्याचं स्वप्न लहानपणापासूनच होतं. सकाळी शाळा आणि संध्याकाळी काम यामध्ये त्याचं बालपण वाहून गेलं. पण या सर्व संघर्षातूनच एक असामान्य व्यक्तिमत्त्व तयार होणार होतं जे पुढे जाऊन संपूर्ण जिल्ह्याला परिचित होईल, आणि अनेक नवतरुणांसाठी आदर्श ठरेल.
निलेश भाऊ ठाकरे यांचं बालपण हे फक्त गरिबीत नव्हे, तर मानसिक आणि भावनिक संघर्षांनी भरलेलं होतं. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती अगदी सुरुवातीपासूनच हलाखीची होती. वडील प्रभाकर ठाकरे यांना दारूचं व्यसन असल्याने ते नियमितपणे कामावर जात नसत. त्यामुळे मजुरी मिळे अथवा न मिळे, या दैनंदिन प्रश्नांनी संपूर्ण कुटुंबाची साखळी हलखलून जायची. त्या काळात दोन किरायाच्या छोट्याशा खोल्यांत निलेश भाऊ, त्यांचे तीन भावंड, आई आणि वडील असे सहा जण एकत्र राहत होते. जागेची, खाण्याची, शिक्षणाची समस्या या कुटुंबाला रोज भेडसावत होती.
या सगळ्या संघर्षाच्या गर्तेत, वयाने दुसऱ्या क्रमांकाचा असलेला निलेश भाऊ लवकरच मोठ्याची जबाबदारी घेऊ लागला. बालपणी खोडकर, मस्तमौला वाटणारा मुलगा, अचानक कुटुंबाचा आधार बनून गेला. घरातल्या परिस्थितीचा परिणाम शाळेवरही झाला. आठवीत असतानाच, म्हणजे वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षापासून त्याने शिक्षणासोबत काम करण्याचा निर्णय घेतला.
शाळा सुटताच निलेश भाऊ चंद्रपूरमधील ‘राधाकृष्ण थेटर’मध्ये कामाला जायचे. सकाळी सहा वाजल्यापासून रात्री बारा वाजेपर्यंत त्यांचं कामकाज चालायचं. या कामात जेवढं आर्थिक समाधान मिळत होतं, त्याच्या कितीतरी पटीने जास्त मानसिक समाधान मिळायचं. कारण त्या पैशांनी घरात चुल पेटायची. त्या थेटरमधील प्रत्येक दिवस म्हणजे निलेश भाऊंसाठी कर्तव्य, जबाबदारी आणि स्वाभिमानाचं प्रतीक ठरत होतं.
शाळेच्या पुस्तकांबरोबरच त्यांनी हाती घेतलेलं हे काम फक्त थेटरपुरतं मर्यादित राहिलं नाही. आपल्या हाताला काम असावं, म्हणून त्यांनी अनेक प्रकारची कष्टाची कामं केली. मंडप डेकोरेशन, वेल्डिंग, आणि बांधकामावर रंगकाम अशा क्षेत्रांमध्ये त्यांनी स्वतःला झोकून दिलं. रंगकाम म्हणजे काही दिवसांचं काम नाही; सलग दहा वर्षे त्यांनी घरं आणि इमारती रंगवण्याचं काम केलं. त्या रंगांमध्ये त्यांचं स्वप्नही मिसळलेलं होतं, स्वतःच्या आयुष्यालाही एक सुंदर रंग द्यायचा होता.
कधी काम असायचं, कधी नसायचं. अशा काळात एका वर्षासाठी ते मुंबईत गेले. नवी मुंबईतील ‘फायझर कंपनी’त त्यांनी नोकरी पत्करली. परंतु त्या भल्या मोठ्या शहरात त्यांचं मन रमेना. मोठ्या इमारती, दगडधोंड्यांची माणसं आणि मनाच्या संकुचित वागणुकीत त्यांचं संवेदनशील मन अडकलं. म्हणून त्यांनी परत चंद्रपूरच्या मातीत येण्याचा निर्णय घेतला.
या पुनरागमनानंतर त्यांच्या आयुष्यात एक महत्त्वाचा वळण आला, अजय विनायक रामटेके या तरुण व्यावसायिकाने निलेश भाऊंमध्ये दडलेला आत्मविश्वास, चिकाटी आणि मेहनतीचा गुण ओळखला. अजय रामटेके यांनी त्यांना व्यवसायाच्या क्षेत्रात विशेषतः मार्केटिंगमध्ये मार्गदर्शन केलं. केवळ मार्गदर्शनच नव्हे, तर त्या कठीण काळात ते त्यांच्या पाठिशी उभे राहिले. मार्केटिंगच्या क्षेत्रातून निलेश भाऊंनी हळूहळू आपल्या आर्थिक परिस्थितीवर मात केली. त्यांच्या पायाखालची जमीन घट्ट झाली आणि त्यांनी आपली व्यावसायिक ओळख निर्माण करण्याची दिशा पकडली.
निलेश भाऊ ठाकरे हे फक्त कलावंत, क्रीडापटू किंवा सामाजिक कार्यकर्तेच नाही तर ते एक संवेदनशील मन घेऊन चालणारे लेखनीचे सैनिकही होते. त्यांना लहानपणापासून गाणं आणि कविता लिहण्याची प्रचंड आवड होती. त्यांच्या शब्दात भाव होते, त्यांची ओळख गायक म्हणून झाली असली तरी अंतर्मनात एक विचारशील, भेदक आणि सामाजिक भान असलेला लेखक दडलेला होता.
पत्रकारितेचा कोणताही अनुभव नसताना त्यांनी या क्षेत्रात प्रवेश केला तो केवळ त्यांच्या विचारसंपन्नतेच्या जोरावर. आंबेडकरी चळवळीच्या “महानायक” या वृत्तपत्रात शहर प्रतिनिधी म्हणून काम करण्याची पहिली संधी त्यांना जिल्हा प्रतिनिधी जितेंद्र डोहणे यांनी दिली. ही संधी निलेश भाऊंसाठी केवळ एक काम नव्हतं, तर ती त्यांच्या आयुष्यातील एका नव्या पर्वाची सुरुवात होती. कदाचित त्यांचं स्वतःलाही तेव्हा ठाऊक नव्हतं, की ही लेखणीच एक दिवस त्यांना राज्य आणि राष्ट्रीय स्तरावर पोहोचवेल.
पत्रकारितेची खरी सुरुवात इथून झाली. सुरुवातीच्या टप्प्यात त्यांनी वृत्तसंकलन, लेखन, संपादन याचा अत्यंत मन लावून अभ्यास केला. “मिशन इंडिया न्यूज” या टीव्ही चॅनेलमध्ये त्यांनी जिल्हा प्रतिनिधीपासून कार्यकारी संपादक पदापर्यंत प्रवास केला. विशेषतः कोरोनाच्या कठीण काळात जेव्हा बहुतांश लोकांनी आपल्या घरी सुरक्षित राहणं पसंत केलं, तेव्हा निलेश भाऊंनी जीव धोक्यात घालून लोकांच्या व्यथा, अडचणी, प्रश्न, प्रशासनाच्या अपयश या सर्व गोष्टी जनतेसमोर मांडल्या. त्यांच्या लेखणीने केवळ बातम्या मांडल्या नाहीत, तर अनेक समस्यांवर आवाज उठवून त्या सोडवण्यासाठी जनमत तयार केलं.
सध्या निलेश भाऊ ‘दैनिक कळंब नगरी’ या स्थानिक वृत्तपत्राचे उपसंपादक असून, ‘न्यूज ब्लास्ट’ या वेब पोर्टलचे मुख्य संपादक म्हणून देखील काम पाहतात. दोन्ही ठिकाणी ते केवळ बातम्या देत नाहीत, तर त्या बातम्यांमधून समाजाचा आरसा उभा करतात. पत्रकारितेचा केवळ व्यवसाय म्हणून न पाहता, निलेश भाऊंनी ती एक सामाजिक चळवळ म्हणून स्वीकारली आहे. त्यांचा विचारसरणीवर ठाम विश्वास आहे. फुले, शाहू, आंबेडकर या पुरोगामी महापुरुषांच्या विचारांची शिदोरी घेऊनच त्यांनी पत्रकारिता केली आहे.
बल्लारपूर येथील प्रतिभावान कवी आणि सडेतोड पत्रकार नरेंद्र सोनारकर यांचं मार्गदर्शन त्यांना लाभलं आणि याच प्रेरणेने निलेश भाऊंनी २०१७ साली ‘राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघा’च्या चंद्रपूर जिल्हा प्रभारी पदाची जबाबदारी स्वीकारली. त्यांनी या पदाचा केवळ उपयोग केला नाही, तर त्या पदाला प्रतिष्ठा मिळवून दिली. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक पत्रकारांना या संघटनेशी जोडण्याचं महत्त्वाचं कार्य त्यांनी केलं. त्यांच्या नेतृत्वगुणांनी प्रभावित होऊन त्यांना पुढे विदर्भ संघटकपद देण्यात आलं.
गोंदिया, भंडारा, गडचिरोली, नागपूर, वर्धा, अमरावती, यवतमाळ आणि अकोला अशा अनेक जिल्ह्यांमध्ये त्यांनी ‘राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघा’ची बीजं रोवली. हे केवळ संघटनात्मक काम नव्हतं, तर विचारांची शिस्तबद्ध पेरणी होती. त्यांचे संघबांधणीचे कौशल्य, संवादकौशल्य आणि संयमी नेतृत्व पाहून २०२३-२४ च्या कालावधीत त्यांना महाराष्ट्र राज्य सचिवपदाची जबाबदारी देण्यात आली. हे पद केवळ नावापुरतं नव्हतं तर त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रात संघटनेला मजबुती दिली, सक्रियता वाढवली आणि कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण केलं.
ते इथवरच थांबले नाहीत. त्यांच्या कार्यक्षमतेची दखल स्वतः संघाचे संस्थापक अध्यक्ष मा. विजय सूर्यवंशी आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष बाबासाहेब अडांगडे यांनी घेतली आणि जानेवारी २०२५ च्या कार्यकारणीत त्यांना ‘राष्ट्रीय संघटक’ या अत्यंत महत्त्वाच्या पदावर नेमण्यात आलं. ही नुसती पदोन्नती नव्हती, तर एक राष्ट्रीय जबाबदारी होती जी त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे स्वीकारली आणि अंमलात आणली.
आज निलेश ठाकरे हे राष्ट्रीय पातळीवर कार्यरत असलेले चंद्रपूर जिल्ह्यातील पहिले पत्रकार ठरले आहेत. केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित न राहता त्यांनी गुजरात, तेलंगणा, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश अशा राज्यांमध्ये पुरोगामी पत्रकार संघ पोहोचवला आहे. त्यांची ही वाटचाल म्हणजे एका सामान्य युवकाची असामान्य झेप आहे. जिच्यामध्ये विचारांचं बळ, कार्यक्षमता, आणि सामाजिक बांधिलकी यांचा त्रिवेणी संगम आहे.
गेल्या दशकभरापासून निलेश भाऊ ठाकरे हे पत्रकारितेच्या क्षेत्रात सक्रिय आहेत. पण ही सक्रियता केवळ बातम्या संकलित करण्यापुरती मर्यादित नाही. त्यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून जनतेच्या मनातील आवाज बनण्याचं काम केलं आहे. सामाजिक अन्याय, प्रशासनाची उदासीनता, नागरिकांच्या मूलभूत गरजांवरील दुर्लक्ष अशा विविध मुद्द्यांवर त्यांनी स्पष्ट आणि निर्भीड भाषेत प्रशासनाला वेळोवेळी प्रश्न विचारले आहेत. अनेक बंद पडलेली सरकारी यंत्रणा त्यांच्या बातम्यांमुळे जागी झाली, अनेक लोकांना न्याय मिळाला. पत्रकारितेच्या या माध्यमातून त्यांनी जनतेला जागृत केलं, अधिकारांची जाणीव करून दिली, प्रश्न विचारण्याचं बळ दिलं.
आज निलेश ठाकरे हे नाव चंद्रपूर जिल्ह्यात केवळ एक पत्रकार म्हणूनच नव्हे, तर एक विश्वासू, सामाजिक भान असलेलं, संवेदनशील आणि बहुआयामी व्यक्तिमत्त्व म्हणून घेतलं जातं. ते एक कुशल खेळाडू, हसवणारा पण हृदयस्पर्शी कलावंत, निर्भीड पत्रकार, संवेदनशील सामाजिक कार्यकर्ता आणि प्रभावी राजकीय विचारवंत म्हणून ओळखले जातात. अगदी कमी वयात त्यांनी पत्रकारितेत जी उंच झेप घेतली, ती फार थोड्यांना साध्य होते. ते कोणत्याही राजकीय पक्षाचे खास माणूस नसूनही लोकांमध्ये त्यांचं नाव आदराने घेतलं जातं. कारण त्यांनी आपल्या कार्यातून आपली ओळख निर्माण केली आहे.
२०१७ मध्ये चंद्रपूर महानगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांनी आपल्या भागातील ०९ प्रभागातून स्वबळावर निवडणूक लढवली. ही त्यांची राजकीय क्षेत्रातील पहिलीच पायरी होती, तरीही त्यांनी भक्कम मते मिळवून स्थानिक राजकारणात आपली ताकद दाखवून दिली. जनतेशी प्रामाणिक नातं असलेली माणसं मतांच्या आकड्यांनी नव्हे, तर लोकांच्या विश्वासाने मोठी होतात हे त्यांनी सिद्ध करून दाखवलं.
आज ‘निलेश ठाकरे’ हे नाव चंद्रपूर जिल्ह्यात एक आदराचं, विश्वासाचं आणि लढ्याचं प्रतीक बनलं आहे. अनेकजण त्यांना प्रेमाने ‘ठाकरे सरकार’ या नावाने ओळखतात. हे नाव त्यांच्या मित्रपरिवाराने त्यांना दिलेलं असलं, तरी त्यामागे असलेलं श्रम, संघर्ष, आणि संवेदनशील नेतृत्व हे त्यांचं खऱ्या अर्थाने “सरकार” बनवणारं आहे. येत्या २९ जुलै २०२५ रोजी त्यांचा वाढदिवस अनेक ठिकाणी जल्लोषात, स्नेहभावाने आणि कृतज्ञतेने साजरा केला जाणार आहे. त्यांच्या जीवनप्रवासाकडे पाहिलं, तर हा फक्त एक वाढदिवस नसून, एका सामान्य माणसाच्या असामान्य संघर्षाला, समर्पणाला आणि यशाला सलाम करण्याचा दिवस आहे. त्यांच्या या जिद्दीने भरलेल्या जीवनकहाणीचा, समाजासाठी दिलेल्या योगदानाचा आणि अनेक तरुणांसाठी प्रेरणा ठरलेल्या या संघर्षमय वाटचालीचा आढावा घेणारा हा लेख म्हणजे एका सामान्य कुटुंबातील मुलाच्या असामान्य होण्याची साक्ष आहे.
✍️…निलेश भाऊ यांचा एक शुभचिंतक




